पांडुरंग पोळे नावाचा एक उच्च शिक्षित पहिलवान विधानसभेच्या आखाड्यात…


पांडुरंग पोळे नावाचा एक उच्च शिक्षित पहिलवान विधानसभेच्या आखाड्यात…

उमरगा –  शांत, संयमी, उच्च शिक्षीत व दोन वेळा अपक्ष उमेदवार म्हणून उमरगा लोहारा मतदारसंघाची निवडणूक लढविलेले आष्टा कासार ता. लोहारा येथील सुपुत्र प्रा. पांडुरंग पोळे हे मतदार संघात सुपरीचित असून त्यांनीही शिवसेना उबाठा पक्षाकडून तिकीटाची मागणी केली आहे.
प्रा. पांडुरंग पोळे हे या मतदारसंघातातील रहिवासी असल्याने व त्यांचा मतदार संघात सतत वावर असल्याने त्यांना मतदार संघाची स्थिती माहिती आहे. शिक्षणाने इंजिनिअर, वकील, एम. ए., एमफील असणारे प्रा. पांडुरंग पोळे यांनी इंजिनिअर व न्यायाधीश पदाचा राजीनामा देऊन प्राध्यापक म्हणून सेवा बजावत आहेत. आजही ते सेवेत सक्रीय असून त्यांना महाराष्ट्र शासनाने २०११ मध्ये शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च राज्य स्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. याशिवाय प्रा. पांडुरंग पोळे हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या शिक्षण सेवा परिक्षेत व महाराष्ट्र शासनाच्या विधी विभागाच्या परिक्षेत यश संपादन केले आहे. त्यांनी बुद्धीच्या माध्यमातून अनेक विभागातील दोष उघड करून त्यात सुधारणा करून घेतलेली आहे. मागच्या अठ्ठावीस वर्षांपासून ते पत्रकार म्हणूनही सक्रिय आहेत.

Advertisement

एक स्टार पत्रकार म्हणून संबोधित आस्थापनाने गौरविलेले आहे. शिवाय ते महाराष्ट्र शासनाच्या वतीने लिहिल्या जाणाऱ्या क्रमिक पुस्तकाचे लेखक सुद्धा आहेत. शिक्षण घेत असताना आलेल्या समस्या, गरिबी त्यांनी अनुभवली असल्याने त्यांनी समाजाला न्याय देण्यासाठी २००९ व २०१४ ची उमरगा लोहारा मतदारसंघाची निवडणूक अपक्ष उमेदवार म्हणून पूर्ण क्षमतेने लढविली असल्याने त्यांची नाळ मतदार संघाशी जुळलेली असून ते मतदारात गुणी, हुशार, उच्च शिक्षीत व स्पष्ट वक्ता म्हणून चांगलेच परिचित आहेत. त्याची संयमी वृत्ती व साधी राहणी व प्रसिद्धी पासून दूर राहण्याची सवय मतदार संघाच्या भविष्याला उपयोगी पडणारी आहे. आजही त्यांनी उमरगा – लोहारा विधानसभेसाठी शिवसेना (उबाठा) पक्षाकडे तिकीटाची मागणी केली आहे. मागणी करताना तालुका स्तरावरील सर्व पदाधिकारी व जिल्हा स्तरावरील लोकप्रतिनिधी व पक्षप्रमुख यांना आपला बायोडाटा दिला आहे. मात्र त्यांनी मातोश्री पर्यंत धाव घेतलेली नाही की वारंवार नेत्यांना संपर्क साधून तंग केले नाही. मतदार संघातील मतदार, स्थानिक पक्ष पदाधिकारी यांना सर्वश्रेष्ठ समजणाऱ्या या आदर्श शिक्षकाला शिवसेना (उबाठा) पक्ष संधी देणार का आणखी कोणाला हे येणारा काळच ठरवेल. सर्व बाजूंनी सक्षम असलेल्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाच्या या प्राध्यापकाला उमेदवारी मिळाल्यास मतदार संघ विकसित होईल अशी चर्चा मतदारांतून होत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »