भाजप निवडणूक रोख्यांच्या जोरावर पक्ष फोडतो – राहुल गांधी
भाजप निवडणूक रोख्यांच्या जोरावर पक्ष फोडतो – राहुल गांधी
मुंबई – निवडणूक रोखे देशातील नव्हे तर जगातील सर्वात मोठे खंडणी रॅकेट आहे. सीबीआय आणि ईडी तपास करत नाहीत, ते भाजपची वसुली करतात, असा घणाघाती प्रहार काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला. भाजप निवडणूक रोख्यांच्या जोरावर पक्ष फोडतो ही राष्ट्रविरोधी कृती असून राष्ट्रवादी काँग्रेस पैशाने फोडल्याचा आरोप त्यांनी केला. देशात ज्या संस्था अस्तित्वात होत्या, त्या आता भाजप आणि आरएसएसचे हत्यार आहेत, त्यामुळेच हे सर्व घडत असल्याचे राहुल म्हणाले. या संस्थांनी त्यांचे काम केले असते तर हे सर्व घडले नसते. तसेच या सर्व संघटनांनी विचार करावा की एक दिवस भाजपचे सरकार जाईल, मग कठोर कारवाई केली जाईल.पत्रकार परिषद राहुल गांधी म्हणाले की, निवडणूक रोखे म्हणजे कंपन्यांकडून हप्ता घेण्याचा प्रकार आहे. यामध्ये अनेक कंपन्या असून काही कंपन्यांचे नाव येणे बाकी आहे. सर्व संस्थांना भ्रष्टाचार करायला सांगत असून ही पंतप्रधानांची आयडिया आहे. गडकरी किंवा आणखी कोणाची ही आयडिया नाही. महाराष्ट्रात जे दोन तुकडे केले त्याचे पैसे कुठून आले? देशात जिथे जिथे सरकार पाडले त्याचे पैसे कुठून आले? पक्ष फोडण्याचे काम अमित शाह करत आहेत. सीबीआय, ED एक्सटॉर्शन करते. शिवसेना, राष्ट्रवादीला याच पैशातून तोडल्याचा आरोप राहुल यांनी केला. सीबीआय आणि ED हे आरएसएसचे हत्यार असल्याचा आरोप त्यांनी केला.भाजप राज्यांमध्ये जी सरकारे पाडत आहे, त्यासाठी पैसा कुठून येतो? भाजपने संपूर्ण राजकीय व्यवस्था ताब्यात घेतली आहे. तपास यंत्रणा आता तपास करत नसून वसुली करत आहेत. यापेक्षा मोठी देशद्रोही कृती असू शकत नाही, असेही ते म्हणाले. राज्यांमधील काँग्रेस सरकारांनी दिलेले करार आणि इलेक्टोरल बाँड्स यांचा काहीही संबंध नाही.तपास यंत्रणांचा वापर करून कंपन्यांकडून वसुली केली जात आहे, मोठमोठ्या कंत्राटांचा हिस्सा घेतला जात आहे, असे राहुल म्हणाले. कंत्राट देण्यापूर्वी निवडणुकीच्या देणग्या घेतल्या जात आहेत. ही संपूर्ण रचना पंतप्रधान मोदींनी तयार केली आहे. मिलिंद देवरा यांच्याबाबत राहुल गांधी म्हणाले की, देवरा यांनी भाजपमध्ये प्रवेश करणे ही मोठी गोष्ट नाही. मिलिंद देवरा आणि अशोक चव्हाणांनी पक्ष सोडला, पण आमचा पक्ष कायम आहे. हा पैसा वापरून राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फोडले.